म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यातच भाषा आणि समाजशास्त्र विषयाची तोंडी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. ‘मटा’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक सुनील मगर यांनी ही माहिती दिली.
दहावीचे अंतर्गत गुण कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना गुण कमी मिळतील आणि अकरावी प्रवेशात इतर मंडळांचे विद्यार्थी कुरघोडी करतील, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत ‘मटा’ने बुधवारी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी मगर यांनी ही माहिती दिली. ‘नोव्हेंबर अखेरपर्यंत ‘बालभारती’च्या वेबसाइटवर सराव परीक्षांची प्रश्नपत्रिका उपलब्ध होईल. यामुळे नवीन अभ्यासक्रम व १०० गुणांची परीक्षा देताना कशी तयारी करावी, हे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनाही समजेल’, असेही मगर म्हणाले. विद्यार्थ्यांनी सोडविलेली प्रश्नपत्रिका शिक्षक किंवा विद्यार्थी व पालक तपासू शकतील. विद्यार्थ्यांच्या चुकांचे निरसन करण्याची यंत्रणाही या व्यवस्थेत आहे.
व्हाट्सअॅपवर सबस्क्राइब करा
दहावी अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांना प्रशिक्षण
राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकेबद्दल शिक्षकांना विविध स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘मटा’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे(एससीईआरटी) संचालक सुनील मगर यांनी ही माहिती दिली. दहावीचा अभ्यासक्रम बदलाचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. ‘पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचा अंदाज घेण्यास नक्कीच मदत होईल’, असेही ते म्हणाले. अशा प्रकारच्या पाच परीक्षा घेण्याचा परिषदेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या चर्चासत्रात मगर यांच्यासोबत राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष विजयशीला सरदेसाई, सोमय्या विनय मंदिरचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक, शिक्षक प्रतिनिधी जालिंदर सरोदे, भाषा शिक्षक उदय नरे आणि पनवेल येथील सेंट जोसेफ या सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापक कल्पना द्विवेदी सहभागी झाले होते.
सरावाचे टप्पे
१. ‘बालभारती’च्या वेबसाइटवर प्रश्नपत्रिका झळकणार
२. ती सोडवण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळणार
३. प्रश्नांची प्रमाणित उत्तरे वेबसाइटवरच दिली जाणार
४. प्रत्येक प्रश्नाच्या अपेक्षित उत्तराबाबतही मार्गदर्शन
५. त्यासाठी तज्ज्ञांचे व्हिडीओ यूट्युब चॅनेलवर दिसणार