प्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’

म. टा. प्रतिनिधी, नगर
विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात प्राध्यापकांनी केलेल्या बेमुदत काम बंद आदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांना संप काळातील दिवस भरून काढण्यासाठी दिवाळी सुट्टी आधार ठरली आहे. या काळात बहुतांश कॉलेजांमधील प्राध्यापकांनी आपली २१ दिवसांची सुट्टी कमी करून जादा तास घेऊन संप काळातील दिवस भरून काढले आहेत.
प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी २५ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. हे आंदोलन १० ऑक्टोबरपर्यंत सुरू होते. जिल्ह्यातील जवळपास ५५ कॉलेजांमधील एक हजार प्राध्यापक या बंदमध्ये सहभागी झाले होते; मात्र, संप काळात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या व रविवार वगळता तेरा दिवस हे संप मिटल्यानंतर भरून काढण्याचे आदेश प्राध्यापकांना देण्यात आले. त्यानुसार विविध कॉलेजांच्या प्राध्यापकांनी या तेरा दिवसांचे नियोजन केले आहे. काही कॉलेजांच्या प्राध्यापकांनी कॉलेजांना असणारी दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी कमी करून घेऊन संप काळातील दिवस भरून काढले. तर, काही कॉलेजांमधील प्राध्यापकांनी दिवाळीच्या सुट्टीमधील काही दिवस कामावर हजर राहून व रविवारी जादा लेक्चर घेऊन संप काळातील दिवस भरून काढायचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कॉलेज प्रशासनानेसुद्धा संप काळात सहभागी झालेल्या प्राध्यापकांच्या सुट्टीचे नियोजन करून दिले आहे.
……
संप काळातील दिवस भरून काढण्यासाठी कॉलेजनिहाय नियोजन केले आहे. आम्ही दिवाळीची सुट्टी कमी करून संप काळात वाया गेलेले काही दिवस भरून काढले आहेत. विद्यार्थीसुद्धा कॉलेजमध्ये उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करीत आहेत.
– बाळासाहेब सागडे, स्थानिक शाखा अध्यक्ष, स्पुक्टो