नगर : पदवीधर शिक्षकांची वेतननिश्चिती आणि पदोन्नतीबाबतची कार्यवाही तत्काळ करण्याची मागणी जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांनी केली आहे. या मागणीसाठी शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन केले. यात पदवीधर समन्वय समितीचे राज्य समन्वयक मिलिंद काळपुंड, वेणूनाथ ठोंबरे, रवींद्र पटेकर, बाळासाहेब भोसले, प्रकाश आरोटे, विरेश नवले, रामदास धनवडे, शिवाजी गोर्डे, मच्छिंद्र जाधव, जी. के. रामफळे, संजय चव्हाण, बाळकृष्ण चोपडे आदी सहभागी झाले होते.
राज्य सरकारच्या परिपत्रकास दोन वर्षे उलटूनही शिक्षण संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही केलेली नाही. शासन निर्णयानुसार सामाईक सेवाज्येष्ठता यादी तयार करावी, सेवाज्येष्ठतेबाबत निर्माण झालेल्या व होत असलेल्या कायदेशीर प्रकरणांबाबत त्वरित सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढावीत, शैक्षणिक संस्थांना येणाऱ्या पगार पत्रकांच्या देयकासोबत सन २०१८ ची सेवाज्येष्ठता यादी तयार करणे बंधनकारक करावे या मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागास देण्यात आले. या आंदोलनात बापूसाहेब गायकवाड, दिलीप वाकचौरे, प्रकाश डोळस, नानासाहेब भोर, विजय हुसळे, भीमराज आव्हाड, सुनील भिंगारदिवे, शंकर शिंदे, प्रताप आहेर, सुनील गाडगे आदींसह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.