शाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू

50 हजार विद्यार्थ्यांना लाभ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील शाळा आज सोमवारपासून गजबजणार असून पहिला दिवस गोड करण्यासाठी ‘अन्नामृत फाउंडेशन'(इस्कॉन) तर्फे पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहारसोबत बुंदीचे लाडू मिळणार आहेत.
दिवाळीच्या २१ दिवसांच्या सुटीनंतर शाळा सुरू होत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर द्वितीय सत्रासाठी शाळा सज्जही झाल्या आहेत. सुटीमध्ये धम्माल, मस्ती केल्यानंतर शाळेचा पहिला दिवशी अनेकदा विद्यार्थ्यांना नकोसा वाटतो. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड व्हावा या हेतुने ‘इस्कॉन’ने हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यासाठी पोषण आहारासोबत गोड म्हणून बुंदीचे लाडू दिले जाणार आहेत. ‘अन्नामृत फाउंडेशन’तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व संलग्नित शाळा, बालवाडीतील बालक मिळून, असे पन्नास हजार विद्यार्थ्यांना लाडू दिले जाणार आहेत. गरवारे स्टेडियमजवळील ‘अन्नामृत फाउंडेशन’मध्ये हे लाडू बनिवण्याचे काम सुरू आहे. बुंदी लाडू वितरण कार्यक्रमाचे उदघाटन सोमवारी सकाळी आठ वाजता शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, वाहतूक नियंत्रणचे सहायक आयुक्त एस. भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सर्व ठिकाणी हे लाडू पोहचविले जाणार आहेत.