म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्युनियर कॉलेजांमधील अकरावीच्या १६५ तुकड्यांत २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, यात साधारण २५ तुकड्या अनुदानित आहे. त्यामुळे उर्वरित १४० विनाअनुदानित तुकड्या येत्या काळात बंद होऊन शिक्षक सरप्लस होऊन त्यांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. तुकड्या बंद होणार असल्यास नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांची सोय जवळच्या कॉलेजात करण्यात येईल.
केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे ज्युनियर कॉलेजांत सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि बायफोकल शाखेत प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्युनियर कॉलेजांत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीच्या तब्बल ३० हजार ७४३ जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९ हजार ७४३ हजारांनी रिक्त जागा वाढल्या आहेत, तर नवीन कॉलेजांतील ३२ तुकड्यांत शून्य विद्यार्थ्यांचे प्रवेश; तर १६५ तुकड्यांत ० ते २० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे अकरावीच्या १६५ तुकड्या कमी विद्यार्थ्यांमुळे अडचणीत येणार आहेत. यात २५ तुकड्या अनुदानित आहेत. शिक्षण विभागाने या तुकड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शिक्षक सरप्लस होऊन त्यांना नजीकच्या कॉलेजात वर्ग केले जाऊ शकते.
मात्र, विनाअनुदानित तुकड्यांत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येणार असल्याची शक्यता आहे. कॉलेजांमध्ये संचमान्यता होत असल्याने विद्यार्थी संख्येवर शिक्षकांचे प्रमाण निश्चित केले जाते. कॉलेजांमधील तुकड्यांत विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी असेल, तर तेथील शिक्षकांना मान्यता मिळणार नाही. त्यामुळे प्रवेशसंख्या कमी झाल्याने तेथील शिक्षकांना नोकरीपासून वंचित राहावे लागेल, तर या तुकड्यांत प्रवेशित विद्यार्थ्यांना जवळच्या कॉलेजात वर्ग केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘नवीन तुकड्यांना मान्यता नको’
ज्युनियर कॉलेजांत १६५ तुकड्यांत २० पेक्षा कमी विद्यार्थी, तर ३७४ तुकड्यांमध्ये ३० पेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. यासोबतच ३७६ तुकड्यांत ५० पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकंदरीतच, कॉलेजांत जागा रिक्त राहत असताना शिक्षण विभागाकडून नवी कॉलेज आणि तुकड्यांना का मान्यता देण्यात येते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अकरावीच्या तुकड्यांत जागा रिक्त असूनदेखील शिक्षण विभागाने २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षासाठी १४ हजार ९१५ जागांची वाढ करून प्रवेशक्षमता ७९ हजार ६७५ हून ९४ हजार ५८० करण्यात आली. त्यानंतर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी पाच हजार ८५ जागांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमता ९७ हजार ४३५ एवढी झाली. यंदा नव्या तुकड्यांना मान्यता दिल्यास प्रवेशक्षमता एक लाख होईल. मात्र, रिक्त जागांची संख्यादेखील त्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे नवीन तुकड्यांना मान्यता नको, अशी मागणी करण्यात येत आहे.
१६५
शहरातील अकरावीच्या एकूण तुकड्या
२५
अनुदानित तुकड्या
१४०
विनाअनुदानित तुकड्या
३०,७४३
२०१८-१९ साठी अकरावीच्या रिक्त जागा
९,७४३
गेल्या वर्षीच्या तुलनेत रिक्त जागांत वाढ