अतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हास्तरावर सोमवारी होत आहे. त्यापूर्वी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शिक्षकांचा वर्ग घेत त्यांना सूचना केल्या. अनेक संस्था अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाला आपल्या संस्थेत समायोजन करून घेण्यास नकार देतात. त्याचबरोबर गणित, विज्ञान विषयाच्या रिक्त जाागा जास्त, तर अतिरिक्त शिक्षक हे इतर विषयाचे आहेत. त्यामुळे संभाव्य गोंधळ विचारात घेता त्यांची उजळणी या वर्गात करण्यात आली.
शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाला समायोजनाची प्रक्रिया सुचली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९० शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, तर खासगी संस्थांमध्ये रिक्त जागा शंभर आहेत. समाजयोजनाची प्रक्रिया २६ नोव्हेंबर रोजी करण्याचे निर्देश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत. त्याची तयारी जिल्हास्तरावर सुरू आहे. समायोजनाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेत शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाने बोलावून माहिती दिली. शाळांमधील रिक्त जागा, संबंधित शाळा कोणत्या याची माहिती देऊन कोठे अडचणी येऊ शकते हे सांगण्यात आले. यंदा संच मान्यता नसल्याने वेतन पथकाकडून रिक्त जागांची माहिती घेण्यात आली. त्यामुळे रिक्त जागांमध्ये बदल होण्याची शक्यता होती. अशा रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर २१ नोव्हेंबरपर्यंत शिक्षक, संस्थाचालकांचे आक्षेप मागविण्यात आले.
\Bसमुपदेशन आज
\Bजिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनद्वारे सोमवारी समायोजनाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही प्रक्रिया सकाळी दहापासून सुरू होणार आहे. सुरुवातीला रिक्त जागांबाबत खासगी संस्थांमध्ये प्रक्रिया होणार आहे. त्यातून समायोजन न झालेल्या शिक्षकांचे समोयाजन विभागातील इतर जिल्ह्यांमधील शाळांमध्ये करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार. यानंतर शिक्षकाचे समायोजन होऊ न शकल्यास राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया होणार आहे. दुसऱ्या सत्रात ही प्रक्रिया होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रक्रिया करणे अपेक्षित असताना, अशा प्रकारचा विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.