अनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, या मागणीासाठी राज्यातील शिक्षकांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी शहरातून पुन्हा शिक्षकांचा एक जथ्था आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न १८ वर्षांपासून आहे. तत्कालिन आघाडी सरकारने कायम शब्द काढला, मात्र अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. युती सरकारच्या काळातही हा प्रश्न प्रलंबितच आहे. एक व दोन जुलै २०१६ रोजी पात्र शाळांची यादी काढत २० टक्के अनुदानाची घोषणा केली, मात्र दोन वर्षांनंतरही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या प्रश्नावर शिक्षकांनी विभागीय पातळीवर आंदोलने केली. त्यानंतर विधीमंडळावर आंदोलन सुरू आहे. त्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातील शिक्षक आल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले. सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासह शिक्षणमंत्र्यांनी विधीमंडळात आश्वासन दिल्याने सोमवारी मुख्यमंत्री या प्रश्नावर बैठक घेण्याची शक्यता आहे. त्या बैठकीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.