म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी या पदावर नितीन बच्छाव यांच्याऐवजी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांची नियुक्ती करण्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आदेशाला आयुक्त तुकाराम मुंढेंनी सोमवारी केराची टोपली दाखवली. शिक्षणाधिकारी या पदाची संगीतखुर्ची करणाऱ्या शिक्षण संचालनालयाची मुंढे यांनी कानउघडणी केली असून, वर्ग एकच्या पदासाठी वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला पदभार देण्यास नकार दिला. त्यामुळे पदभार घेण्यासाठी आलेल्या देवरेंना सोमवारी पदभार न घेताच माघारी परतावे लागल्याची चर्चा आहे. दर आठवड्याला शिक्षणाधिकारी बदलण्यापेक्षा नियमित शिक्षणाधिकारी देण्याचा सल्लाही शिक्षण विभागाला त्यांनी दिला.
महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांची उच्च माध्यमिक बोर्डात बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवला होता. गेल्याच आठवड्यात बच्छाव यांनी पालिकेत येऊन पदभार स्वीकारला होता. परंतु, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे काम पेलवत नसल्याचे सांगत, बच्छाव यांनी महापालिकेचा पदभार काढून घेण्याची विनंती शिक्षण संचालनालयाकडे केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपवावा असे आदेश काढले होते. त्यानुसार देवरे सोमवारी महापालिकेत आदेश घेऊन आले. परंतु, मुंढे यांनी त्यांना पदभार देण्यास नकार दिला. शिक्षणाधिकारी हे पद वर्ग एकचे आहे, तर देवरे हे वर्ग दोनचे अधिकारी आहेत. त्यामुळे वर्ग एकच्या पदावर वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला पदभार देण्यास मुंढे यांनी नकार दिला. शिक्षण विभागाकडून सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ बंद करण्याचा सल्ला दिला. दर आठवड्याला शिक्षणाधिकारी बदलण्यापेक्षा नियमित शिक्षणाधिकारी द्या, असा सल्ला दिला. त्यामुळे देवरे यांना पालिकेतून रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
मुंढेंची धास्ती
शिक्षण विभागातील सावळ्या गोंधळामुळे आयुक्त मुंढेंनी नितीन उपासनी यांची यापूर्वीच चौकशी लावली आहे तर, त्यांच्या जागेचा अतिरिक्त पदभार घेणाऱ्या बच्छावांनी मुंढेंचाच धसका घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे बच्छाव हेसुद्धा काम करण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. त्यांनी यातून सुटका करून घेण्यासाठी देवरेंचा नंबर लावल्याची चर्चा आहे. परंतु, मुंढे यांनी देवरेंच्याच नावावर काट मारल्याने आता बच्छाव यांना काम करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.