म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आल्यानंतरही शहरातील काही प्रतिष्ठित इंजिनीअरिंग कॉलेजांकडून ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तगादा लावण्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे. सोमवारी पेपर असताना विद्यार्थ्यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी तगादा लावल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करावा की अर्ज करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकारने राजश्री शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांना सरकारच्या महाडीबीटी पोर्टलमधून भरायचे आहेत. मात्र, मुदत असूनही शहरातील इंजिनीरिंग कॉलेज विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या कालावधीत अर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचा रविवार हा शेवटचा दिवस असल्याचे सांगून त्यांना अर्ज भरण्याचा आग्रह करण्यात येत आहे.
अर्ज भरण्यासाठी रविवार शेवटचा दिवस आहे. रविवारनंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, अशी भीती वजा धमकी अनेक कॉलेजांनी विद्यार्थ्यांना दिली आहे.
बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीच्या अर्जासोबत जोडण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले नाहीत. त्यामुळे ही कागदपत्रे व दाखले काढण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. तर दुसरीकडे रविवारपर्यंतच अर्ज भरा असा तगादा कॉलेजांनी लावल्याने विद्यार्थी पेचात सापडले आहेत.
ऐन परीक्षेत कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ वाया जात असल्याने आम्ही अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
….
अभ्यास करू की अर्ज भरू?
‘राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ नोव्हेंबरपूर्वी अर्ज भरणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, कॉलेजने ऐन परीक्षेच्या कलावधीत अचानक रविवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याचे सांगत रविवारीच अर्ज करा, असा तगादा लावला आहे. त्यामुळे आम्ही अभ्यास करायचा की, अर्ज भरायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ‘कॉलेजांनी अंतिम मुदत जवळ आल्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे लक्षात आणून द्यावे,’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.