म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर वर्गाची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. या परीक्षेत कोणताही बदल झाला नसल्याचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर वर्गांची परीक्षा येत्या ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. चार जिल्ह्यात एकूण ४९ परीक्षा केंद्रावर ३५ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. चार ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी असून १२ नोव्हेंबरपासून पुढील विषयांची परीक्षा होणार आहे. दिवाळीच्या सुटीपूर्वी व सुटीनंतर अशी दोन टप्यात परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी गावी जाताना गैरसोय होईल. त्यामुळे परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने केली होती. याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी व प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले होते. सूर्यवंशी यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी विद्यापीठात परीक्षा मंडळाची बैठक झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता उपस्थित होते. परीक्षेचे वेळापत्रक बदलल्यास परीक्षा यंत्रणेवर ताण पडणार आहे. तसेच किमान १२ दिवस परीक्षा पुढे ढकलली जाईल. हा वेळेचा अपव्यय ठरेल असा निष्कर्ष बैठकीत निघाला. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ३१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
\Bबीडच्या केंद्रावर वाद\B
बीड येथील महिला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उशिरा आलेल्या पाच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव करण्यात आला. केवळ पाच ते दहा मिनीट उशीर झाला होता. परीक्षेला बसता न आल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाले अशी तक्रार विद्यार्त्यांनी परीक्षा विभागाकडे केली. याबाबत प्राचार्या सविता शेटे यांच्याशी सूर्यवंशी यांच्याशी बोलून माहिती घेतली. या प्रकरणी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
पदव्युत्तर वर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आठ दिवस दिवाळीची सुटी आहे. त्यानंतर पुन्हा सुरळीत परीक्षा सुरू होईल. परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.
डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग