म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह सहा नोव्हेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह ७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत होती, तर विलंब शुल्कासह सहा नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, या कालावधीत काही विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात अडचणी आल्यामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार नियमित विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून सरल डाटाबेसमार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी २२ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सरल डेटाबेसमध्ये समावेश नसलेल्या अन्य विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीनुसारच ऑनलाइन अर्ज करावे लागतील. विलंब शुल्कासह सात नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयांना १२ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान नियमित शुल्कासह व ३ डिसेंबर ते सात डिसेंबरदरम्यान विलंब शुल्कासह चलनाद्वारे शुल्क भरता येईल. शुल्क भरल्यानंतर उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा करायच्या आहेत. त्यासाठी एक नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची यादी ‘एक्सेल शीट’मध्ये प्रिंट करून घ्याव्यात व त्यात आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
२२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर
नियमित शुल्कासह अर्जाचा कालावधी
७ ते ३० नोव्हेंबर
विलंब शुल्कासह अर्जाचा कालावधी
१२ ते १७ नोव्हेंबर
कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमित
शुल्कासह शुल्क भरण्याचा कालावधी
३ ते ७ डिसेंबर
कनिष्ठ महाविद्यालयांनी विलंबित
शुल्कासह शुल्क भरण्याचा कालावधी