म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाजाच्या वेळेत एकत्रित बसून सलग काही तास ‘वाचन ध्यास’ म्हणून व्यतीत करावा, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.
यामध्ये ‘एक व्यक्ती एक पुस्तक भेट’ हा उपक्रम राबवला जावा. प्रत्येक व्यक्ती किंवा शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप असतील, अशी पुस्तके भेट द्यावी, शाळांमध्ये ‘वाचू आनंदे’ तासिका राबवण्यात यावी, कलामांच्या पुस्तकावर व्याख्याने, लेखक व कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करावे, पुस्तक प्रदर्शन, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनाने घडलेले संस्कार याविषयी माहिती देणे व विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, असे विविध उपक्रम राबवण्याचे आदेश आहेत.