म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
पावसाने फिरवलेली पाठ, पाण्याचे कोरडे पडलेले उद्भव या मुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या टंचाईच्या झळा जशा नागरिकांना व जनावरांना बसत आहेत तशा झळा आता ग्रामीण भागातील शाळांनासुद्धा बसू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजना नंतर या विद्यार्थ्यांना पाणी कोठून उपलब्ध करून द्यायचे तसेच भोजन बनवताना लागणारे पाणी कोठून आणायचे, या प्रश्नामुळे शाळा व्यवस्थापन समिती सध्या त्रस्त झाली आहे.
या वर्षी तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने सरासरीच्या एवढासुद्धा पाऊस झाला नाही. परिणामी अनेक गावांतून आता टँकरची मागणी होत आहे. चालू वर्षी तालुक्याची निवड ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी झाल्याने तालुक्यातील अनेक गावांत जलसंधारणेची कामे झाली. या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असता तर ‘वॉटर कप’ स्पर्धेत झालेल्या कामामुळे दुष्काळाच्या झळा तालुक्याला बसल्या नसत्या. सध्या निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपली पिके व जनावरे कशी जगवायची याचबरोबर पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे असा प्रश्न पडला आहे. शेतकरी व नागरिकांची अशी अवस्था असताना आता ग्रामीण भागातील शाळांच्या व्यवस्थापनाला विद्यर्थ्यांसाठी पाणी कोठून आणायचे, या प्रश्नाने भेडसावले आहे. शाळा, विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान भोजन दिले जाते. हे भोजन दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पाण्याची गरज भासते या शिवाय भोजन बनवतानासुद्धा पाणी लागते ते कोठून उपलब्ध करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शाळा व विद्यालयांत बोअर आहे; मात्र, जमिनीतील पाणीपातळी घटल्याने हे बोअर आटून गेले आहेत तर काही शाळा व विद्यालयांत बोअर तसेच नळकनेक्शन नसल्याने पाणी कुठून आणायचे ही चिंता भेडसावत आहे. गावातील सार्वजनिक विहिरीतून पाणी आणायचे तर ते कसे आणायचे असाही प्रश्न या शाळा व विद्यालयांसमोर उभा राहिला आहे.
काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असला तरीही टँकरचे पाणी केवळ ग्रामस्थांना दिले जात असल्याने हे पाणी शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेता येत नाही परिणामी काही शाळा व विद्यालयांच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना घरूनच येताना सोबत पाणी आणावे, अशा सूचना दिल्या आहेत तर काही शाळा व्यवस्थापनाने शाळेसाठी टँकरची व्यवस्था करावी, असे लेखी पत्र गटशिक्षणाधिकारी यांना दिले असले तरीही ही समस्या दूर होईल की नाही या विषयी साशंकता व्यक्त होत आहे.
कोट :
खरंवडी कासार येथील भगवान विद्यालयात सुमारे ८०० विद्यार्थी असल्याने येथे मुलांना पिण्यासाठी व पोषण आहार तयार करण्यासाठी रोज ५ हजार लिटर पाणी लागते. पाण्याअभावी पोषण आहार कसा तयार करावा, मुलाना पाणी कोठून द्यावे हा प्रश्न व्यवस्थापनापुढे आहे. टँकरचे पाणी मिळावे या मागणीचा पत्र व्यवहार गटशिक्षणाधिकारी , गटविकास आधिकारी, तहसीलदार यांच्याशी केला आहे .
– सुनील अंदुरे, मुख्याध्यापक, भगवान विद्यालय, खरवंडी.