म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारचा धिक्कार असो, कायम विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजला तत्काळ १०० टक्के अनुदान मिळावे, शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सर्किट हाउस परिसरात जेलभरो आंदोलन केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षकांची उपेक्षा करू नये, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. कृती समितीचे राज्याध्यक्ष तानाजी नाईक, राज्य सचिव चंद्रकांत बागणे, विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. याप्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीकाही करण्यात आली. आंदोलनात बी. एस. बरगे, एस. व्ही. पारळे, जयसिंग जाधव, विलास साठे, शेखर देसाई, व्ही. व्ही. म्हस्के, एन. बी. मुल्ला आदींनी सहभाग घेतला.
०००००
गवंडी, सलून काम करण्याची वेळ
विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक विनावेतन काम करत आहेत. पंधरा-वीस वर्षे नोकरी करूनही शिक्षकांना न्याय मिळाला नाही. कुटुंबांचा गाडा ओढण्यासाठी हुपरी येथील विलास साठे गवंडीकाम करत आहेत. शिराळा येथील सुनील काशीद सलून काम करत आहे. शालेय वेळेत शिक्षक आणि शाळा सुटल्यानंतर लहानसहान कामे करुन कुटुंबांचा गाडा ओढत आहेत. राज्यातील ३१०० शाळांमधील २२५०० शिक्षकांना ‘विना अनुदानित’चा फटका बसला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ७००० शिक्षकांची परवड सुरू आहे.