म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावरील कारवाईवरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत जोरदार पडसाद उमटले. सीईओंना कारवाईचे अधिकार असताना, त्यांनी कार्यमुक्तीला स्थगिती कुठल्या आधारावर मिळवली यासंबंधी प्रशासनाने खुलासा करावा असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी घेतला. दरम्यान, सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सभेत कुठलाही वाद उदभवू नये म्हणून अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेला बसू नये अशी सूचना केली होती. त्यानुसार लोहार हे सभेला उपस्थित नव्हते.
पन्हाळा येथील रेस्ट हाऊस भाडेतत्वावर चालविण्यास देण्यावरुन सदस्यांत मतभेद आहेत. सभेत रेस्ट हाऊस भाडेतत्वावर देण्यावरुन उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्यामध्ये खडाजंगी उडाली. उपाध्यक्ष पाटील यांनी रितसर ठराव होऊन ठेका दिला असताना पुन्हा विरोधाचे कारण काय, पुन्हा निविदा प्रकिया होणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्याला सदस्य निंबाळकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. बहुसंख्य सदस्यांचा विरोध आणि बांधकाम व समाजकल्याण समिती सभापतींनी त्यासंबंधी तक्रार दिली असताना रेस्ट हाऊस भाडेतत्वावर चालवायला देण्याची प्रकिया का राबवली, अशी विचारणा निंबाळकर यांनी केली. यावरुन वाद वाढत जाऊन दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.
सदस्य अरुण इंगवले यांनी इचलकरंजी येथे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत महिला लाभार्थ्याकडून ५०० रुपयांची लाच मागितली आहे. त्यावर काय कारवाई केली अशी विचारणा केल्यावर प्रशासनाकडून चौकशीची ग्वाही देण्यात आली. कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील ग्रामपंचायत विभागाची जुनी इमारत कसलीही परवानगी न घेता पाडल्याचे व खासगी जागेत विना परवाना बांधकाम सुरू असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईप्रश्नी २७ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्टापुढे भक्कम कागदपत्रे सादर करु असे उत्तर प्रशासनाने दिले. दरम्यान, लोहार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ‘दिवाळी सणामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे म्हणून प्रस्तावाच्या मंजुरीचे काम सुरू असल्याने कार्यालयात होतो. अध्यक्षांनी तुमचा विषय उपस्थित झाल्यावर बोलवू असे सांगितले होते.’