परवानगी न घेतल्यास कारवाई; शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे. शाळा-कॉलेजांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना शाळा-कॉलेजांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहे. दरम्यान, यंदा निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक व अपघातस्थळी यापुढे शैक्षणिक सहली काढता येणार नसल्याने किती शाळा-कॉलेजांमधून सहली निघतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
शाळा, ज्युनिअर कॉलेजांकडून दर वर्षी शैक्षणिक सहली काढण्यात येतात. गेल्या एक-दोन वर्षापूर्वी सागरकिनारी भागात व इतर काही निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक स्थळी सहली काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी अपघात घडले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण देखील गमवावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सहलींसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजांनी नियमानुसारनुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात. स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे. सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्यानंतर शाळा प्रशासन, पालक, शिक्षण विभाग यांच्यात आपासात वादही झाल्याचे प्रकार घडले आहेत. शिक्षण आयुक्तालय व शिक्षण संचालनालयाकडून सहलीला परवानगी दिलेल्या स्थानिक शिक्षण विभागाच्या कार्यालयांना दंडात्मक कारवाईसही सामोरे जावे लागले आहे.
त्यानंतर सरकारच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सहली काढण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली होती. आता चालू शैक्षणिक वर्षात सहली काढताना सरकारच्या शाळा व ज्युनिअर कॉलेजांना नियमावलीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ज्ञानात व विकासात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक ठिकाणीच सहली काढाव्या लागणार आहेत. या सहली काढण्यापूर्वी त्याचे प्रस्ताव स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे.
कोट
शाळा-कॉलेजांनी नियमानुसारनुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– मीनाक्षी राऊत, प्रभारी शिक्षण उपसंचालक
सहल काढण्यासाठी पुढील कारवाई करावी लागणार
– मुख्याध्यापक-प्राचार्यांना सहलीला परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करणे
– प्रस्तावासोबत मुख्याध्यापक, प्राचार्यांचे हमीपत्र, विद्यार्थ्यांची यादी, सहलीच्या ठिकाणाची माहिती
– संस्थेच्या व्यवस्थापनाच्या परवानगीचे पत्र, आरटीओ पासिंग परवाना जोडणे
– पालकांचे व विद्यार्थ्यांचे हमीपत्र, सहलीचे एकूण अंतर व कालावधी जोडणे
– विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची माहिती, सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे
– विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत