म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे नवी मुंबई महापालिकेत समायोजन करण्यात आले. मात्र आठवडा होऊनही महापालिकेने या शिक्षकांना कामावर न घेतल्याने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तसेच सेवेत खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे. समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याची उत्तरे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दिली जात आहेत. मात्र कधी समायोजन होणार, हे गुलदस्त्यात असल्याने शिक्षकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
मागील अनेक दिवसांपासून समायोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संथगतीने सुरू असलेल्या समायोजनाच्या प्रक्रियेमुळे शिक्षकांची धाकधूक वाढली होती. मात्र आता अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे महापालिकांमध्ये समायोजन करूनही शिक्षकांची फरफट थांबलेली नाही. २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील सन २०१६-२०१७ च्या संच मान्यतेनुसार ऑनलाइन समायोजन झाल्यांनतर उर्वरित अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील वेगवेगळ्या महापालिकांत करण्यात आले आहे. यापैकी नवी मुंबई महापालिकेमध्ये समायोजन केलेल्या शिक्षकांमध्ये हिंदी माध्यमाचे ५, गुजराती ते हिंदी माध्यम १८ आणि मराठी माध्यमातील ६२ असे एकूण ८५ शिक्षकांचा समावेश आहे. नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर महापलिकांतही शिक्षकांचे समायोजन केले आहे. त्यानुसार सर्व शिक्षक त्या-त्या शाळेतून कार्यमुक्त केले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समायोजनाच्या ठिकाणी हजर होण्यास शिक्षक गेले. मात्र शिक्षकांना हजरच करून घेण्यात येत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पालिकेतील शिक्षणाअधिकारी यांनी अतिरिक्त शिक्षकांना तात्काळ हजर करून घ्यावे आणि अहवाल सादर करावा, असे आदेशच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाअधिकारी (प्राथमिक) यांचे आहेत. मात्र पालिका प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
आठवडा होऊनही ८५ शिक्षकांना कामावर हजर करून घेण्यास नवी मुंबई महापालिका टाळाटाळ करत आहे. सर्व शिक्षकांनी पालिकेच्या कार्यालयात धाव घेतली होती. मात्र तेथेही कार्यालयाच्या आतमध्ये येण्यास मज्जाव केल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच धाव घेतली होती. पालिका आयुक्त दिल्लीला असल्याने समायोजनाची प्रक्रिया रखडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी पुन्हा हे सर्व अतिरिक्त शिक्षक पालिका कार्यालयावर धडकले होते. मात्र, कामावर रुजू करून घेण्याबाबत काहीच हालचाली झाल्या नसल्याचे समजते. याबाबत शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडेही तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने समायोजनाचे स्पष्ट आदेश असून द्विधा परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त केल्यापासून कामावर हजर करून घ्यावे. वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास आपले कार्यालय जबाबदार असेल, असे पत्रच नवी मुंबई पालिकेला पाठविले आहे. समायोजन लवकर न झाल्यास सेवेत खंड पडण्याची भीती शिक्षकांना सतावू लागली आहे.
०००००
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालिकेत ८५ शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश असले तरी समायोजन करताना पालिकेतील रिक्त पदांची संख्या, ती पदे कोणत्या संवर्गातील आणि कोणत्या माध्यमांची आहेत, या सर्व गोष्टी विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही करण्यात येईल.
संदीप संघवे
शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका