ज्युनिअर कॉलेजांच्या तक्रारीनंतर बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
फेब्रुवारी-मार्च २०१९मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची अर्जप्रक्रियेत सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची अर्जविषयक माहिती सरल डाटाबेस प्रणालीत भरताना काही ज्युनिअर कॉलेजांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत ज्युनिअर कॉलेजांच्या तक्रारीही मंडळाकडे दाखल झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून पत्रकाद्वारे मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार २१ ऑक्टोबरपर्यंत हे अर्ज भरण्याच्या दिलेल्या मुदतीत वाढ करण्यात आली असून ३० ऑक्टोबर आता विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा असतात. या परीक्षांचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक होणे आवश्यक असते. मात्र, सरल प्रणालीद्वारे माहिती भरताना अडचणींचा सामना करावा लागल्याने ज्युनिअर कॉलेजांच्या मागणीनुसार मुदत वाढ देण्यात आली आहे. विज्ञान, कला व वाणिज्य शाखांच्या विद्यार्थ्यांसाठीच ही मुदतवाढ देण्यात आली असून सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास कॉलेजांना पुरेसा वेळ मिळू शकणार आहे. अर्जानंतर १२ ते १७ नोव्हेंबर या दरम्यान परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे. परीक्षांचे अर्ज हे केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार असून उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमार्फत विद्यार्थ्यांनी ती भरायची असून www.mahahsscboard.in, www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे. परीक्षांबाबत जाहीर केलेल्या इतर सर्व तारखा सारख्याच असणार असून केवळ बारावीच्या अर्जांसाठीच मुदतवाढ दिल्याचे मंडळाच्या सचिवांकडून सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच अर्जासोबत नियमित शुल्क, विलंब शुल्क भरणे आवश्यक असून ते न भरलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे.