सिग्नल शाळेतील मुलांसाठी सुरू होतेय बँक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे
कॅशकाऊंटरवर जाताच पे स्लिप भरत हाती येणारी रोख रक्कम, व्याजदराची आकडेमोड करीत बांधली जाणारी आर्थिक गणिते, पासबुक भरण्यासाठी लागणारी रांग हे चित्र शहरातील कोणत्याही बँकेचे नसून सिग्नल शाळेत दिसणारे आहे. विद्यार्थ्यांना बँकिग क्षेत्राची ओळख करून देतानाच विद्यार्थ्यांची आर्थिक पुंजी सुरक्षित रहावी यासाठी सिग्नल शाळेची खरीखुरी बँक सुरू होत असून याच विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी मुक्त प्रयोगशाळेचा बेतही आखण्यात आला आहे.
पालकांसह सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांच्या हातात वही पुस्तक देत त्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या सिग्नल शाळेने आता मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी झपाट्याने प्रयत्न सुरू केले आहेत. पालकांमधील निरक्षरता, माहितीचा अभाव यांमुळे अंधश्रद्धांच्या गर्तेत अडकलेल्या कुटुंबांची विज्ञान साक्षरता दृढ व्हावी, यासाठी शंभरहून अधिक प्रयोगांनी सज्ज असलेली मुक्त प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे. मो. ह. विद्यालयाच्या १९६९मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थ्यांकडून सिग्नल शाळेत मुक्त प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे. या प्रगोयशाळेत चौथी ते दहावी अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाबाहेरील शंभरहून अधिक प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. मार्गदर्शकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना स्वच्छता, आरोग्य या विषयांची माहिती प्रयोगशाळेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कष्टकरी कुटुंबाचा भाग असलेले हे विद्यार्थी शाळेच्या वेळेनंतर सिग्नलवर वस्तू विकण्याचेही काम करत असल्याने त्या विक्रीतून मिळालेल्या कष्टाची कमाई बँत सुरक्षित रहावी, त्याचा योग्य विनिमय व्हावा तसेच बँकिंग क्षेत्रात वावरण्याची विद्यार्थ्यांना सवय लागावी यासाठी टीजेएसबी सहकारी बँकेच्या सहयोगाने सिग्नल शाळा बँकेची सुरुवात केली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्रपासबुक देत त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या लिखित नोंद असून व्याजदर, पैसे गुंतवणूक यांचेही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यासह तीन हात नाक्याच्या सिग्नल व्यतिरिक्त इतर सिग्नलवर असलेल्या मुलांना सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक अशी डिजिटल वर्गखोली सिग्नल शाळेत उभारण्यात आली असून यामध्ये ई लर्निंगच्या माध्यमातून शाळेटे नवे विद्यार्थीही धडे गिरविणार आहे. या प्रकल्पांची सुरुवात शनिवार ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी शाळेचा दीपोत्सवही साजरा होणार आहे.
व्हाट्सअॅपवर सबस्क्राइब करा
नवा टप्पा
शाळेच्या पहिल्या दोन वर्षात ही संकल्पना रुजविली असली तरी आता एक नवे पाऊल टाकले जात आहे. शिक्षणासह इतर सुविधाही या विद्यार्थ्यांना दिले जाणे गरजेचे असून त्यांचे विचार, आरोग्य यांच्या दृष्टिने हो दोन्ही उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत. नव्या खोलीमुळे सिग्नल शाळा परिवारात नवे सदस्य सहभागी होणार असल्याचा आंनंद आहे.