म. टा. वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईडचा सहावा राज्यस्तरीय मेळावा १ ते ७ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.
स्काऊट आणि गाइडची राज्य संस्था मुंबई, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मेहेराबाद व अहमदनगर भारत स्काऊट आणि गाइड जिल्हा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले होते. दिपावलीच्या सुटीत हा मेळावा होणार होता. दिपावलीच्या सुट्टीत हा मेळावा होणार असल्याने पालक व शिक्षकांच्या विनंतीनुसार हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानुसार १ ते ७ डिसेंबर या कालावधीत अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मेहेराबाद अरणगाव येथे होणार आहे. या बदललेल्या तारखांची सहभागी होणाऱ्या विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी नोंद घ्यावी, असे अवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, या मेळाव्याचे नियोजनाची जोरदार तयारी करण्यात आली असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक शरद दळवी यांनी दिली. मेळाव्याच्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. राज्यभरातून येणाऱ्या स्काऊट व गाईडच्या सुरक्षेसाठी नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. मेळावा स्थळी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसाठी अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे पदाधिकारी जाल दस्तूर, रमेश जंगले यांच्यासह इतर पदाधिकारी बैठका घेऊऩ आढावा घेत आहेत. मेळाव्याच्या नियोजनासाठी जय्यत तयारी सुरु आहे.