मनोज देशमुख, एमडी रेडिओलॉजी आणि इमेजिंग
……
सीटी करोनरी अँजिओग्राफी या चाचणीचा उपयोग करून रक्तवाहिनी निमुळती होण्याची प्रक्रिया लक्षात येते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या गुठळ्या समजतात. शरीराला अधिक छेद करणाऱ्या कॅथेटर अँजिओग्राफी या चाचणीला ही पर्यायी चाचणी आहे. कॅथेटर अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिनीमध्ये कॅथेटर घालण्यात येते. ही चाचणी करण्याचा सल्ला हृदयविकारतज्ज्ञ, हृदयविकार शल्यविशारद किंवा प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरकडून देण्यात येतो. हृदय सुरू असताना या प्रक्रियेद्वारे इमेजिंग करण्यात येते.
हृदयाची किंवा हृदयातील रक्तवाहिन्यांची क्रॉस सेक्शन स्थितीमधील छायाचित्रे घेण्यासाठी सीटी स्कॅनर एक्स-रे आणि अतिरिक्त क्षमता असलेल्या संगणकाचा वापर करतात. विविध प्रकारचे हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी हे स्कॅन मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहेत. कोणताही आजार होण्याआधी रक्तवाहिनी निमुळती होणे यात समजू शकते.
कार्डिअॅक सिटीअँजिओग्राफी केल्यामुळे विविध प्रकारचे हृदयविकार समजू शकतात. यात हृदयविकाराच्या रक्तवाहिनीचा आजार, धमनीचा आजार आणि हृदयाशी संबंधित इतर आजार समजू शकतात. ज्यांच्या स्ट्रेस टेस्टमधून निश्चित निदान झालेले नाही, अशा रुग्णांसाठी या तपासणीची मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे शल्यविशारद तसेच इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट्स यांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यासाठी या चाचणीची मदत होऊ शकते.
……….
कार्डिअॅक सीटी स्कॅन केव्हा करावे?
– हृदयातील रक्तवाहिन्या निमुळत्या झाल्यामुळे किंवा त्यात गुठळ्या झाल्यामुळे छातीत दुखत आहे का, हे निश्चित करण्यासाठी कार्डिअॅक सीटी अँजिओग्राफी हा पर्याय आहे. हा पर्याय पारंपरिक कॅथेटरवर आधारित अँजिओग्रामपेक्षा वेगळा आहे. कॅथेटरवर आधारित तपासणीमध्ये कॅथेटर रक्तावाहिन्यांमध्ये घालण्यात येतो. कॅथेटर घालून अँजिओग्राम काढण्याची आवश्यकता नसल्याचे सीटी अँजिओग्राफीमधून समजू शकते.
– सीटी तपासणीवरून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा धक्का टाळण्यासाठी रुग्णाला स्टॅटिन हे कोलेस्टरॉल कमी करणारे औषध घ्यायची गरज आहे का आणि इतर औषधे किंवा जीवनशैलीतील बदल करण्याची आवश्यकता आहे का, हे निश्चित करण्यास हृदयविकार तज्ज्ञांना मदत होते.
– इन्क्लुसिव्ह स्ट्रेस टेस्ट – स्ट्रेस टेस्टमधून निश्चित निदान झाले नाही, तर डॉक्टर कार्डिअॅक सीटी स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. या चाचणीमधून हृदयातील रक्तवाहिनीच्या समस्या किंवा इतर समस्या समजू शकतात.
– हृदयविकार असणे – छातीत दुखण्याप्रमाणे, श्वास लागणे, मान, जबडा, पाठ किंवा खांदेदुखीची समस्या इत्यादी हृदयविकाराची लक्षणे जाणवत असतील, तर अशा व्यक्तीने सीटी अँजिओग्राफी करून घेणे योग्य असते.
– हृदयातील रक्तवाहिनीच्या बायपास शस्त्रक्रियेनंतर बायपास ग्राफ्ट्सचे मूल्यमापन करणे.
– जन्मजात व्यंग किंवा हृदयातील रक्तवाहिन्यांचे मूल्यमापन करणे.