म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तंबाखुमुक्त शाळांसाठी पाच वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न कुचमाकी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापकांना डिसेंबरपर्यंत शाळा तंबाखुमुक्त शाळा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदीचे आदेशही पाळले जात नाहीत. त्यासह ‘तंबाखुमुक्त शाळा’ असे अभियान शिक्षण विभागाने राबविले. पाच वर्षांनंतरही या अभियानाला यश मिळालेले नाही. शाळांबाबत शिक्षण विभागाने पुन्हा नव्याने ‘तंबाखुमुक्त शाळा’ असा नारा दिला आहे. शाळांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘तंबाखुमुक्त शाळा’ म्हणून घोषित करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील शाळा शंभर टक्के तंबाखुमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. पत्रात स्पष्ट करण्यात आले की, गेल्या पाच वर्षे महाराष्ट्रात तंबाखुमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत तंबाखुमुक्त शाळा घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तंबाखुमुक्त शाळांचे ११ निकष पूर्ण करून त्यांची नोंद ‘टोबॅको फ्री स्कूल’ अॅपमध्ये शाळांना करायची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी मानसिकता निर्माण करण्यासाठी दर सोमवारी तंबाखुमुक्त जीवन संकल्प घेणे, विज्ञान प्रदर्शन, कला स्पर्धांमध्ये तंबाखुमुक्ती हा विषय अंर्तभूत करणे, यासह मुख तपासणी करावी. गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांचे यावर नियंत्रण असणार आहे.
\Bशाळांकडून लेखी हमी
\Bशिक्षण विभाग प्रत्यक्ष शाळांना भेटी देण्यापेक्षा केवळ कागदोपत्री कार्यवाही करत असल्याचे चित्र आहे. शाळांनी उपाययोजनांसाठी काय केले आणि आपली शाळा तंबाखुमुक्त आहे की, नाही याबाबत शिक्षण विभाग लेखी हमी घेते. प्रत्यक्षात किती शाळां परिपूर्ण तंबाखुमुक्त झाल्या याची आकडेवारी विभागाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्यात प्राथमिक सव्वातीन हजार तर, माध्यमिकच्या एक हजार शाळा आहेत.
तंबाखुमुक्त शाळा उपक्रमाबाबत शाळांना वारंवार सूचना दिल्या जातात. जिल्ह्यातील संपूर्ण शाळांनी त्याप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. शंभर टक्के शाळांमध्ये फलकही लावण्यात आले आहेत.
– बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद.